नाशिक : समाजात एकीकडे स्वार्थीपणा आणि लोभीवृत्ती वाढल्याची टीका होत असताना दुसरीकडे गंगापूर रोड भागात राहणाऱ्या एका गृहिणीने तिला रस्त्यात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांना परत करून समाजापुढे इमानदारीचा आणि प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
महिलांना सोन्याचे दागिने विशेष आकर्षित करणारे ठरतात. परंतु, सोन्याचे आकर्षण मनातून बाजूला सारून गंगापूर भागातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलजवळ राहणाऱ्या कल्पना नारायण न्याहाळदे (४३) यांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून देत त्यांना सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांना जसेच्या तसे परत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना न्याहाळदे गुरुवारी (दि. २३) सकाळी आकाशवाणी भाजी मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना एक सोन्याचे मंगळसूत्र रस्त्यावर खाली पडलेले आढळून आले. त्यांनी मंगळसूत्र सापडल्याची माहिती त्यांचे पती नारायण सखाराम न्याहाळदे यांना फोन करून दिली. यावेळी त्यांचे नारायण न्याहाळदे यांनीही प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीत सापडलेले मंगळसूत्र गंगापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कल्पना न्याहाळदे यांनी सापडलेले मंगळसूत्र गंगापूर पोलीस ठाण्यात जसेच्या तसे जमा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला, दरम्यान, न्याहाळदे दाम्पत्याच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.