पंचवटी : जायकवाडी धरणात गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरीचा प्रवाह खळाळल्याने परिसरातील नागरिकांची गोदाकाठावर वाहने धुण्यासाठी गर्दी लोटत आहे. एकीकडे सणासुदीच्या काळात घरे, दुकाने अन् वाहनेही स्वच्छ केली जात असताना दुसरीकडे मात्र गोदावरी अस्वच्छ होत आहे, याचे कुठलेही सोयरसूतक ना नागरिकांना ना प्रशासनाला. त्यामुळे गोदा स्वच्छता मोहीम निव्वळ कागदावरच राहिली आहे.नदीकाठ परिसरात वाहने धुवून जलप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले तरी, या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठावर वाहने धुण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच कपडे धुण्यासाठीही महिलांची रीघ लागत आहे. कुंभमेळा आटोपल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणाचा व स्वच्छतेचा सामाजिक व गोदाप्रेमी संघटनांसह निरी आणि जिल्हा प्रशासनालाही विसर पडल्याने वाहने धुणाऱ्यांचे फावले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन तर होतच आहे; शिवाय नदीचे प्रदूषणदेखील होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
गोदाकाठ बनला वाहने-कपडे धुण्याचे केंद्र
By admin | Updated: November 11, 2015 23:09 IST