नाशिक : गेल्या तीन-चार वर्षांपासून बहुप्रतीक्षेत असलेली घटिका समीप येऊन ठेपली असून, मंगळवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रवि सिंह राशीत प्रवेश करतील तेव्हापासून गोदातटी एका चैतन्यपर्वास अर्थात सिंहस्थ कुंभपर्वकाळास आरंभ होणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरी ध्वजारोहणाने सिंहस्थपर्वाची तुतारी फुंकली जाईल आणि तेरा महिने धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाने भारलेला व मंतरलेला काळ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांना अनुभवण्यास मिळणार आहे. दर बारा वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी गेल्या तीन-चार वर्षांपासून नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनामार्फत अथकपणे सुरू आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वरी कुंभपर्वासाठी लाखो साधू-महंतांसह (पान ७ वर)देश-विदेशातून कोट्यवधी भाविक दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असलेली सिंहस्थ कुंभपर्वाची प्रतीक्षा आता संपणार असून मंगळवारी, दि. १४ जुलैला सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रविचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर सिंहस्थ कुंभपर्वकाळास आरंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१३) नाशिक व त्र्यंबकेश्वर शोभायात्रा निघणार आहेत, तर मंगळवारी सकाळी दोन्ही ठिकाणी पुरोहित संघामार्फत ध्वजारोहण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहस्थपर्वकाळास प्रारंभ झाल्यानंतर बुधवार, दि. १९ आॅगस्ट रोजी तपोवनातील साधुग्राममध्ये आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनासह नाशिक महापालिका आणि त्र्यंबक नगरपालिकेने साधू-महंतांसाठी साधुग्रामची उभारणी केली आहे. याशिवाय नाशिकक्षेत्री रिंगरोडसह वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक यांची सुशोभिकरणाची कामे अंतिम टप्प्यात असल्याने शहर नटले आहे. सिंहस्था कुंभमेळ्यासाठी आता तपोवनातील साधुग्राममध्ये प्रमुख आखाड्यांसह त्यांच्या खालशांकडून निवासव्यवस्था उभी करण्याचे काम सुरू झाले असून, साधू-महंतही डेरेदाखल होत आहे. त्यामुळे तपोवनातील साधुग्राम परिसर नाशिककरांसाठी एक पर्यटनस्थळच बनले आहे. (प्रतिनिधी)
उद्यापासून गोदातटी सिंहस्थ कुंभपर्वकाळ
By admin | Updated: July 12, 2015 23:58 IST