सातपूर : चुकलं असेल काही तर क्षमा असावी देवा...पुढच्या वर्षी सगळं नीट करून लवकर ये पुन्हा..आता निरोप घेतो देवा...अशा आर्जवासह गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करीत अतिशय साधेपणाने विसर्जन करण्यात आले. सातपूर परिसरात २४ हजार ७४६ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून जवळपास २३ टन निर्माल्य जमा झाले आहे.
गत १० दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दिवशी भाविकांवर कोरोना महामारीचा चांगलाच प्रभाव जाणवत होता. घरातील गणपती विसर्जन करण्यासाठी कुटुंबीयांनी गर्दी करणे टाळल्याचे चित्र दिसत होते. महानगरपालिकेने सातपूर परिसरात नंदिनी नदी पूल, गंगापूर धबधबा, सोमेश्वर धबधबा, चांदशी पूल, मते नर्सरी पूल याठिकाणी मूर्ती विसर्जनाची आणि संकलनाची सोय केली होती. शिवाय पाईपलाईन रोड, अशोकनगर पोलीस चौकी, शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. या कृत्रिम तलावातदेखील भाविकांनी श्रींना स्नान घालून मूर्ती विसर्जित केली. घराघरातील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक, ढोल ताशा व गुलाल उधळण्याला फाटा देत फिजिकल डिस्टंन्सिंग पाळत बाप्पाला अतिशय साध्या पद्धतीने शांततेत पण उत्साहात भावपूर्ण निरोप दिला. विसर्जन ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये म्हणून महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
इन्फो
चोख बंदोबस्त
गणपतीच्या मूर्ती जमा करण्यासाठी तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले होते. गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने त्यांनी मूर्ती दान करणे पसंत केले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती संकलन करणे शक्य झाले आहे. अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
इन्फो
२५ हजार मूर्ती दान
नंदिनी नदी पूल, सातपूर-अंबड लिंक रोड. गंगापूर धबधबा, सोमेश्वर चांदशी पूल, आनंदवली, मते नर्सरी पूल, आयटीआय पूल, पाईपलाईन रोड कृत्रिम तलाव, अशोकनगर पोलीस चौकी कृत्रिम तलाव, शिवाजीनगर सूर्या मर्फी चौक कृत्रिम तलाव आदी ठिकाणांवरून २४ हजार ७४६ गणेश मूर्ती दान आणि निर्माल्यासाठी २९ घंटागाड्या लावण्यात आल्या . १३० नागरिकांनी ६८० किलो अमोनिअम बायकार्बोनेटचा वापर केला. टँक ऑन व्हीलच्या माध्यमातून १०४ मूर्ती संकलित करण्यात आल्या.