----
जगभरात सर्वत्र सध्या नोकर कपात, खासगीकरण, ऑनलाईन सुविधा अशा विविध कारणांमुळे नोकरीच्या संधी संकुचित होत असल्याचे मानले जात असले तरी ते अर्ध सत्य आहेे. शासकीय क्षेत्रात उपलब्ध नोकऱ्यांची संख्या घटत असली तरी दरवर्षी अनेक कार्यालये व प्रकल्पांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. खासगी क्षेत्रात तर आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी जणू वाटच पाहत आहेत. देशात दहावी, बारावीनंतर तांत्रिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पदवीधर निर्माण होत आहेत. मात्र, त्यांना नोकरीच्या संधी त्या प्रमाणात उपलब्ध होतात का हा कायमस्वरूपी निरुत्तर असलेला प्रश्न आहे. त्यामुळे हजारो शिक्षित तरुणांना अल्पवेतनावर काम करावे लागत आहे. अन्यथा या तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असताना याउलट आयटीआयमधील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाची गरज आहे. आयटीआयमध्ये एक किंवा दोन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिसशिप) करून प्रशिक्षणार्थी थेट कोणतीही खासगी कंपनी, शासकीय आस्थापना केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग अथवा उपक्रमांमध्ये सक्षम ठरतो. त्याचप्रमाणे तो स्वयंरोजगाराच्या दृष्टीनेही सक्षम होत असल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करून अन्य अर्धकुशल व बेरोजगार तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम ठरू शकतो. थोडक्यात, जगभरात विविध क्षेत्रात कुशल कामगार व कारागिरांची गरज आहे. त्यासाठी केवळ तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.