नाशिकरोड : गिरणारे व महादेवपूर गावात सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसैनिक व ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी हजर नसल्याने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. गिरणारे व महादेवपूर या गावात सतत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोन्ही गावांमध्ये सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी दोन्ही गावांतील शिवसैनिक व ग्रामस्थ विद्युत भवन येथे कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांना निवेदन देण्यासाठी गुरुवारी विद्युत भवन येथे आले होते. मात्र कार्यकारी अभियंता सायनेकर हे कार्यालयात हजर नसल्याने ग्रामस्थ व शिवसैनिकांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकविले. यावेळी विलासराजे सांडखोरे, शरद सांडखोर, सचिन सांडखोरे, संपत फडोळ, शंकर आभाळे, दत्तात्रेय भागवत, दशरथ आगळे, कैलास तांबडे, शांताराम भागवत आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गिरणारे ग्रामस्थांची गांधीगिरी
By admin | Updated: October 2, 2015 23:39 IST