ओझर : कोरोनामुळे लागू केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनला सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी ओझरच्या प्रशासनाने येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाला.रेड, ग्रीन आणि आॅरेंज झोनसंदर्भात रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायिकांना काहीच कळायला मार्ग नव्हता. सोमवारी सकाळी ठरल्याप्रमाणे ओझरचा सकाळचा बाजार भरल्याने गावात एकच गर्दी झाली होती. निफाड तालुका रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली तर गर्दी कमी करताना ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या नाकीनव आले होते. महत्त्वाचे म्हणजे बहुप्रतीक्षेत असलेल्या तळीरामांनी तांबट गल्लीत असलेल्या मद्यविक्री दुकानासमोर एकच गर्दी केली होती.परिणामी भगव्या चौकातील गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर तातडीने ग्रामपालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर, सर्कल अधिकारी प्रशांत तांबे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तलाठी उल्हास देशमुख, प्रशांत अक्कर, सागर शेजवळ यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेतले. त्यात लोकडाउनसंदर्भात बुधवारी चित्र स्पष्ट होणार असून, गर्दी टाळण्यासाठी सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्याबाबत चर्चा झाली. ६ मे रोजी अंतिम निर्णय होईल.अवैध व्यवसायसाकोरा : संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना लॉकडाउनच्या माध्यमातून कोविडवर मात करण्यासाठी शासनाने नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन केले आहे. मात्र याच संधीचा फायदा घेऊन नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात काही अवैध व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत ग्रामपंचायती प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता गावठी दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू केला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केल्याने दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत आहे. येथून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावरील मालेगाव शहरात कोरोनाबाधितांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांत या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, बळींची संख्या बरीच आहे. यासंदर्भात साकोरा ग्रामपंचायतीकडून सर्व व्यावसायिकांना सदर धंदे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.-------------पोलीस कर्मचाºयांची संख्या अपुरीओझर पोलीस ठाण्यात एकूण ४७ कर्मचारी आहेत. त्यात दहाजण मालेगावी बंदोबस्ताला गेले आहेत. त्यात ओझर ते सुकेणेपर्यंतचा परिसराचा विचार केल्यास आजमितीस सात ते आठ हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असल्याचे चित्र आहे. त्यात दहा होमगार्ड स्वयंसेवक म्हणून सामील झाले आहेत. त्यामुळे लोकांवर अंकुश ठेवणे जिकिरीचे ठरत आहे. ओझरमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित सापडला नसला तरी नागरिकांची वर्दळ पाहता वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी वाढीव कुमक द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:02 IST