कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तशृंगी निवासनी देवीमातेच्या मंदिरात भाविकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर फ्युनिकुलर रोप वे या आधुनिक उपक्रमाचे कामकाज प्रगतिपथावर सुरू असून, येत्या तीन महिन्याच्या कालावधीत सदर उपक्रम सर्व भाविकांच्या वापरासाठी खुला केला जाणार आहे, अशी माहिती कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.सद्यस्थितीत विविध सोशल नेटवर्क साइट व व्हॉट्सअॅपवर भगवती मंदिरात जाण्यासाठी रोप वे सुरू झाल्याची खोटी माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जात असल्यामुळे सर्वसामान्य देवीभक्त, भाविक गोंधळून जात आहेत. काही भाविक भगवती दर्शन व रोप वे पाहण्यासाठी सप्तशृंगगडावर येत असून, प्रकल्पाची पूर्णता नसल्यामुळे निराश होऊन परतत असल्याने प्रशासन व यंत्रणेबाबत गैरसमज निर्माण होत आहे. काही भाविक मात्र सदरच्या खोट्या माहितीची शहानिशा करण्याच्या दृष्टीने सप्तशृंगी देवी ट्रस्ट कार्यालयात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असून, देवीभक्त, भाविकांना फ्युनिक्यूलर ट्रॉली सुरू झाल्यानंतर त्याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
फ्युनिक्यूलर ट्रॉली तीन महिन्यात सुरु होणार
By admin | Updated: July 12, 2016 22:29 IST