नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिले. शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सीबीएस, शरणपूररोड, टिळकवाडीमार्गे राजीव गांधी भवनावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी महापालिकेच्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, भ्रष्ट अधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाई करावी तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर राजीवनगर येथील बेघरांचे पुनर्वसन करावे, रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतधारकांना विश्वासात घेऊनच अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी, बेकायदा अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, शहरातील झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन शशिकांत उन्हवणे, नितीन रोडेपाटील, राहुल तुपलोंढे, भिकाजी सावंत, सोपान जाधव, आत्माराम कांबळे यांनी आयुक्तांना दिले. (प्रतिनिधी)