गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंचपदाकडे बघितले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार आतापासूनच फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. तरुणांनी आपल्या गटातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून सरपंच कसा आपल्या गटातील होईल, यासाठी आडाखे आखले जात आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा गावागावातं रंगत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावाच्या विकासासाठी तरुणांचा कल असल्यामुळे ते स्थानिक निवडणुकीकडे आकर्षित झालेले दिसून येत आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण, सुज्ञ आणि सुशिक्षित वर्गाच्या सहभागामुळे काट्याची लढत होण्याची चर्चा सध्या जोर धरीत आहे. ग्रामीण भागात आता कॉर्नर बैठका तसेच कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो यादृष्टीने चर्चा सुरू आहे. तसेच वॉर्डनिहाय मतदार याद्या ,स्थलांतरित मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी, निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक आहेत अशा बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात दिग्गज व्यस्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
लखमापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:00 IST