चांदवड : तालुक्यातील गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसंदर्भात तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांत व तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकरूंच्या वतीने देण्यात आले. या मोर्चाला बसस्थानकाजवळील रहेमत निवास येथून प्रारंभ करण्यात आला. पुढे सोमवार पेठ, शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौकमार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चेकरुंचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार सामोरे न गेल्याने आंदोलकांनी घोषणा देत तहसीलदारांचे दालन गाठले व मागण्यांबाबत जाब विचारला. यावेळी दिलेल्या निवेदनानुसार, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपार्ई मिळावी, तलाठ्याकडून मनमानी कारभार करून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पंचनामे न केल्याची चौकशी व्हावी, हत्याड धरणाची पूर्तता, पुणेगाव कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात सोडण्यात यावे, दारिद्र्यरेषेत असलेल्या लोकांना पिवळे रेशन कार्ड तत्काळ मिळावे, रमाई घरकुल व इंदिरा योजनेअंतर्गत घरकुल मिळावे, चांदवड-देवळा मतदारसंघ त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची सक्तीची वीजदेयके वसुली थांबवावी, रमजान ईद सणाकरिता धान्याचा कोटा रेशन दुकानात उपलब्ध करावा, दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांची चौकशी करावी, आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. भारिप बहुजन महासंघाचे राज्य सचिव डॉ. संजय जाधव, जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, तालुकाध्यक्ष संतोष केदारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आत्माराम वानखेडे, तय्यबखान, इश्तियाक शहा, सुकदेव जाधव आदिंसह भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. (वार्ताहर)
चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: July 25, 2014 00:35 IST