सातपूर : शिवाजीनगर, श्रमिकनगर परिसरातील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीची देयकेच अदा केली नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून येथील नागरिक फुकट पाणी वापरत आहेत.महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने प्रशासन महसूल गोळा करण्यासाठी विविध करवाढीचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे सातपूर परिसरातील शिवाजीनगर आणि श्रमिकनगर भागातील हजारो रहिवाशांना गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेने पाणीपट्टीची आकारणीच केलेली नाही. या परिसरातील नागरिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे धाव घेऊन पाणीपट्टी आकारावी, पाणीपट्टीची देयके मिळावीत म्हणून खेटा मारीत आहेत. नागरिक पैसे भरण्यास तयार आहेत; परंतु त्यांना पाणीपट्टीची देयके संबंधित विभागाकडून दिली जात नाहीत.दरम्यान, या नागरिकांनी प्रभाग नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडे धाव घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली आणि गेल्या दहा वर्षांपासून पाणीपट्टीची देयके मिळालेलीच नाहीत असे लक्षात आणून दिले. नगरसेवक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन या नागरिकांना पाणीपट्टीची देयके लवकरात लवकर द्यावीत, असे सुचविले आहे. (वार्ताहर)
दहा वर्षांपासून फुकट पाणी!
By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST