नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे कृषी विभागामार्फत २५ महिलांना कीटनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले. रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा नाशिक तालुका कृषी विभागाकडून नुकताच घेण्यात आला. हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिके राबविण्यात आली असून, कृषी सहायक सीमा बोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हरभरा पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन केले.नाशिक तालुका कृषी विभागामार्फत नवीन वाणाचा प्रचार, प्रसार, उत्पादन वाढ व कडधान्य पीक क्षेत्रात वाढ होण्यासाठी लोहशिंगवे येथे २५ एकरसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला असून, आरव्हीजी २०२ या वाणाची हरभरा पीक प्रात्यक्षिके तसेच दर आठवड्याला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लोहशिंगवे येथील स्वयंसहायता महिला बचतगटातील २५ महिलांची निवड हरभरा पीक प्रात्यक्षिकासाठी करण्यात आली आहे. यावेळी रब्बी हंगामासाठी आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या हरभरा पिकांच्या प्रात्यक्षिकांच्या प्रशिक्षण शेतीशाळेत सरपंच संतोष जुंद्रे यांच्या हस्ते येथील महिला शेतकºयांना कीटकनाशके व फिनल ट्रॅपचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच संतोष जुंद्रे, उपसरपंच रतन पाटोळे, कृषी सहायक सीमा बोठे, माजी शिवाजी डांगे, मनीषा जैन, विनता झनकर, अनुराधा पाटोळे, शिला जुंद्रे, संगीता पाटोळे आदींसह महिला स्वयंसहायता बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लोहशिंगवेत कृषी विभागातर्फे कीटकनाशकांचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:23 IST