नाशिक : आनंदवली भागातील बळवंतनगर येथील महिलेची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तब्बल पावणेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना ३० जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी छबीलदास मंडलिक (४७) यांना अज्ञात व्यक्तीने जेके-एमएमएसएडीएसवरून मेसेजद्वारे लिंक पाठवून महिलेच्या खात्याविषयी गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडले. या माहितीचा वापर करून चोरट्याने महिलेच्या खात्यावरील बचतीची रक्कम व खात्याला लिंक असलेल्या तीन एफडीवर ऑनलाइन पद्धतीने लोन मंजूर करून घेत ११ लाख ७३ हजार ९९९ रुपयांची रक्कम अनोळखी खात्यावर वर्ग करून काढून घेतली. याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. ६) सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.