सिडको : उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार मंगळवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात अंबड-लिंक रोडसह परिसरातील चार अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले. दरम्यान, अतिक्रमण हटविण्यापूर्वी त्या-त्या धर्माच्या प्रथा-परंपरेनुसार पूजाविधी करण्यात आली. अंबड-लिंकरोडवरील धार्मिक स्थळाबाबत जागा मालकांनी हरकत घेतल्याने काही वेळ कारवाईस विलंब झाला. परंतु, महापालिकेने नियोजित कार्यक्रमानुसार कारवाई पार पाडली. मात्र, काहींनी स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेत सामंजस्याची भूमिका घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेस येत्या ३१ डिसेंबर पर्यंत रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवायचे आहे. त्यानुसार, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ८४ धार्मिक स्थळांची यादी निश्चित केली. मंगळवारी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी सिडको प्रभागातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण मनपाने हटविले. या चारही अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत संबंधितांना नोटिसा देऊन तसेच त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मनपाने वेळ दिली होती. मनपाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या आदेशानुसार मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात केली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास केवलपार्क येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी अतिक्रमण पथकासह जमा झाले, परंतु याठिकाणी धार्मिक स्थळाची देखभाल करणाऱ्या नागरिकांनी संयम दाखवत सामंजस्याची भूमिका घेत स्वत:हूनच अनधिकृत बांधकाम काढून घेतले. अंबड-लिंक रोड येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिक व ग्रामस्थांकडून काही काळ विरोध करण्यात आला. सदर धार्मिक स्थळ हे महापालिका स्थापन होण्याच्या आधीपासून व खासगी जागेत असल्याचा दावा जागामालकांकडून करण्यात आला. परंतु मनपा अधिकाऱ्यांनी सदर अतिक्रमण हे रस्त्याला अडथळा ठरत असल्याने ते काढण्याचे आदेश दिले. यापाठोपाठ याच भागातील जाधव संकुलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या धार्मिक स्थळाचेही अतिक्रमण काढण्यात आले. शेवटी अंबड-लिंक रोड केवल पार्क येथील कारगील चौकातील धार्मिक स्थळाकडे ताफा वळला. मात्र, नागरिकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दुपारी एक वाजेच्या सुमारास चारही ठिकाणच्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. (प्रतिनिधी)
सिडकोतील चार धार्मिक स्थळे हटविली
By admin | Updated: November 9, 2016 00:13 IST