नाशिक : नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, चार पॅनलच्या निर्मितीमुळे निवडणूकही अटीतटीची होणार असल्याची चिन्हे आहेत.
दरवेळेस केवळ दोन अथवा तीन पॅनलमध्ये होणारी आणि टिडीएफसाठी प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक यंदा वेगळ्या अर्थाने गाजते आहे. यंदा प्रगती पॅनल, समर्थ पॅनल, टिडीएफ पॅनल आणि आपलं पॅनल असे चार पॅनल या निवडणुकीच्या मैदानात आहेत. एकेकेळी टिडीएफच्या माध्यमातून शिक्षक आमदार राहिलेले नाना बोरस्तेही यंदा डॉ. अपूर्व हिरे यांच्या अपूर्व पॅनलमध्ये असून, त्यांच्यासह टिडीएफच्या काही खंद्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पॅनलमधून यंदा आपले भवितव्य आजमावण्यासाठी टिडीएफला सोडचिठ्ठी दिली आहे. चारही पॅनलमध्ये दिग्गज पदाधिकारी असल्याने त्यांच्या प्रचारातही रंगत येण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रत्येक पॅनलमधून सुमारे १८ उमेदवार असे एकूण ७२ उमेदवार रिंगणात उभे आहेत.१३००० सभासद असलेल्या या संस्थेसाठी २ आॅगस्ट रोजी मतदान होत असून, तीन आॅगस्ट रोजी शिक्षकांची ही संस्था कोणाच्या हातात जाईल हे स्पष्ट होईल.