नाशिक : ते आले, त्यांनी पाहिले अन् ते गेले या नेहमीच्या चित्राला फाटा देत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नाशिक दौऱ्याची सुरुवात लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेऊन व सविस्तर चर्चा करून, त्यातही विशेष म्हणजे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत भविष्यातील पक्ष बांधणीची वाटचाल निश्चित करण्याबाबत धोरण ठरविण्याच्या दिशेने पाउले उचलल्याचे चित्र होते.जोरदार शक्तिप्रदर्शनाने स्वागत झाल्यामुळे राज ठाकरे यांनी अजूनही पक्षावर आपलीच पकड असल्याचे गुरुवारी दाखवून दिले होते. शुक्रवारी सकाळीही त्यांनी मनसेचे पक्ष कार्यालय राजगड येथे येऊन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांची वन टू वन चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने त्यांनी भविष्यात काय करता येईल, पक्ष संघटन मजबुतीसाठी काय केले पाहिजे, तुम्ही लोकांना भेटता काय, तुमच्या भागात वेगळा काय प्रकल्प तुम्ही राबवू शकता, महापालिकेतील सत्तेचा वापर करून भविष्यात पक्ष संघटन कसे बळकट करता येईल यावरच प्रामुख्याने भर दिल्याचे समजते. त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकासकामांच्या फाईली कशा अडकल्या आहेत, विकासकामांना निधीच नाही याकडे राज ठाकरे यांचे लक्ष वेधले. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत राज यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी महापौर अशोक मुतर्डक, माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, माजी महापौर अॅड. यतिन वाघ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह सिडकोतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. दुपारनंतर त्यांनी थेट मुक्काम असलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन येथे काही निवडक लोकांशी चर्चा केल्याचे समजते. तसेच सायंकाळी उशिरा मनसे पदाधिकाऱ्याच्या नातलगाच्या विवाहाला हजेरी लावल्याचे कळते. (प्रतिनिधी)
झाले गेले विसरा, आता पुढे काय करता येईल?
By admin | Updated: November 28, 2014 23:37 IST