नाशिक : गोहत्त्या बंदी कायदा राज्यात लागू झालेला असतानाही कत्तलखाने बंद झालेले नाहीत. कायदा केल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानत तुरुंगात असलेल्या साधू-महंतांच्या जामिनासह गोहत्त्या बंदी कायदा ७ नोव्हेंबरपर्यंत देशभर लागू व्हावा, अन्यथा दिल्लीत आंदोलन करण्याचा ‘अल्टीमेटम’ राज्यासह केंद्र सरकारला छत्तीसगड मंडळाचे महंत रामबालकदास महात्यागी यांनी दिला. हिंदू सभेच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. महाराष्ट्रात गोहत्त्या बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र राज्यात कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत. नुसतेच सत्संग, प्रवचन करून चालणार नाही, तर त्यासाठी संत स्वतंत्र लढा देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. गो भक्तांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकार गोहत्त्या बंदी कायदा रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत आहे. राज्यात देवनार, औरंगाबाद येथील कत्तलखाने त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.गोरक्षासंदर्भात प्रवचन करून आणि धारदार भाषण करून होत नाही. त्यासाठी गायीच्या दुधाशिवाय इतर दुधाचा उपयोग न करण्याचा आपण संकल्प करावा. धर्म, संस्कृतीसाठी साधूंचे विद्यालय आता फक्त कागदावरच राहिले आहेत. पूर्वी या विद्यालयांना खूप महत्त्व होते. त्यात धर्म शिक्षा देण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले जात होते. मात्र सध्या ते दुरापास्त झाल्याचे इंद्रदेव महाराज यांनी सांगितले.तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंसह चार संतांना जामीन मिळण्याच्या समर्थनार्थ साधुग्राममधील छत्तीसगड मंडप खालशात आयोजित धर्म जागृती हिंदू सभेत साधू-महंतांनी धारदार भाषण करीत एल्गार केला. आसाराम बापूंना फसविण्यात आल्याचे सांगत बापू निर्दोष असल्याचा दावा यावेळी उपस्थित साधू-महंतांकडून करण्यात आला. साध्वी सरस्वती, मौनी बाबा, स्वामी स्वात्मबोधानंद, रामगिरी महाराज, अभिनेत्री अलका गुप्ता यांनी समर्थन करीत संतांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
गोहत्त्या बंदी, संतांच्या जामिनासाठी आंदोलन
By admin | Updated: August 31, 2015 23:48 IST