शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

चळवळीचे केंद्रबिंदू : नामपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

सटाणा : प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण, पांडव यांच्या वास्तव्यामुळे बागलाणला देवभूमीदेखील म्हणतात. शिवशाहीपासून ब्रिटिश काळात झालेल्या अपूर्व लढ्यामुळे बागलाणच्या भूमीला ...

सटाणा : प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण, पांडव यांच्या वास्तव्यामुळे बागलाणला देवभूमीदेखील म्हणतात. शिवशाहीपासून ब्रिटिश काळात झालेल्या अपूर्व लढ्यामुळे बागलाणच्या भूमीला क्रांतिकारी भूमी म्हणूनदेखील ओळखतात. या भूमीने अनेक क्रांतिकारक पुत्रांनादेखील जन्म दिला. ब्रिटिश राजवट नष्ट करण्यासाठी बागलाणच्या पुत्रांचे मोठे योगदान राहिले आहे. सारा वाढविरोधी चळवळ, भिलवाड व पठावे येथील जंगल सत्याग्रह, कायदेभंगाची चळवळ राष्ट्रप्रेमाबद्दल प्रखर भावना असलेले नामपूरचे भूमिपुत्र क्रांतिवीर नरहरशेठ अलई यांनी प्रथम उभी केली. त्यामुळे ब्रिटिश काळात नामपूर हे चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जात असल्याचे इतिहासाची पाने चाळताना दिसून येते.

बागलाणचे बाबा म्हणून ओळखले जाणाऱ्या नरहरशेठ गोपाळ अलई यांचा वीर सावरकर चौकातील वाडा आपल्याला चळवळींचा इतिहास सांगायला लागतो. पूर्वी हा वाडा खूप मोठा होता. वाड्यात एका भागाला रंगमहालही म्हटले जायचे. पूर्वी हा रंगमहाल अनेक चित्रांनी सजलेला होता. यातील चित्र अनेकांना भुरळ घालायची. म्हणूनच त्याला रंगमहाल म्हटले गेले. मात्र ही वास्तू आता शिल्लक नाही. नरहरशेठ यांचा नामपूरच्या अत्यंत सधन कुटुंबात जन्म झाला होता. व्यवसायाने सावकारीत असूनही गरजूंना मोकळ्या हाताने मदत करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकले नाही. शिवाय त्याचा कोणताही हिशेब ते ठेवत नसत, त्यामुळे त्यांना अव्यवहारी शेठ असेही म्हटले जायचे. बागलाणमधील चळवळींना तन, मन आणि धनाने प्रोत्साहन देणारे नरहरशेठ यांच्या वाड्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींची रेलचेल असे. राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेल्यावर स्वातंत्र्यसैनिकाला मदत करणाऱ्या वड‌िलांचे कार्य बाबांनीही सुरू ठेवले. असहकार चळवळ, विदेशी कापडाची होळी, बागलाणातील सारावाढविरोधी चळवळ, कायदेभंग अशा अनेक चळवळीत ते सक्रिय झाले. परदेशी कापडावर बहिष्कार घालून ते थांबले नाहीत. तर आपल्या वाड्यात खादीनिर्मितीचे केंद्र त्यांनी सुरू केले. शंभर चरख्यापासून निघालेल्या सुतापासून वस्त्रनिर्मितीसाठी त्यांनी वीस हातमाग वाड्यात सुरू केले होते. बाबांच्या वाड्यात चरख्याचे संगीत दुमदुमू लागायचे अशी आठवण आजही ज्येष्ठ मंडळी सांगतात. बाबांचा वाडा तर स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान होते. सारावाढविरोधी चळवळीची सुरुवातच त्यांनी नामपूरमधून केली. या चळवळीचे लोण हळूहळू अख्ख्या नाशिकमध्ये असे पसरले की, इंग्रजांमध्येही दहशत निर्माण झाली होती. लोकमान्य टिळकांनीही नरहरशेठ यांच्या वाड्यात बैठक घेऊन नामपूरमध्ये सभा घेतली होती, तर गो. ह. देशपांडे, द. शं. ऊर्फ दादासाहेब पोतनीस, डॉ. खाडिलकर, डॉ. गंगाधर भुतेकर, डॉ. मोहिनीराज काथे, दादासाहेब बीडकर, वा. ज. मराठे, गद्रे वकील, नारायण खुटाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. खरे, वामनराव यार्दी यासारखी मंडळी बाबांच्या वाड्यावर बैठकांना असत. तर सारावाढीच्या लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मार्गदर्शन लाभले होते. बाबांच्या वाड्यात अनेक गुप्त बैठका होत. स्वातंत्र्यसैनिकांना भूमिगत होण्यासाठी वाड्यात लपविले जाई. मिठाच्या सत्याग्रहातही नामपूरहून एक तुकडी रवाना झाली होती. त्यांना इंग्रजांनी अटक करून रत्नागिरी तुरुंगात ठेवले. २१ दिवसांनंतर त्यांची सुटका केली. त्यावेळी त्या सत्याग्रहींनी सोबत आणलेल्या मिठाचा लिलाव करून सहा हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी उभारला व

जंगल सत्याग्रहासाठी तो नरहरशेठ यांच्याकडे दिला. या प्रसंगावरून नामपूरच्या मंडळींनी प्रत्येक लढ्यात संघटित होऊन दिलेले योगदान किती मोठे आहे याचा अंदाज येतो. भिका खंडूशेठ कासार, पुंडलिक दत्त सावंत, गणपत खुटाडे यांच्यासह ग्रामस्थांनीही लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. नरहर अलई यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही झाली. स्वातंत्र्यलढ्याचा पारा नामपूरवर असा काही चढला होता की, २६ जानेवारी १९३० रोजी गावच्या चावडीवर नारायण गणपत खुटाडे यांनी तिरंगा फडकविला. यावरून नामपूरचे वातावरण तंग झाले. शेकडो इंग्रज पोलीस गावात दाखल झाले; मात्र तिरंगा काढण्याची हिंमत कोणाला झाली नाही. अखेर ९ फेब्रुवारी १९३० रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तिरंगा उतरविण्यात आला. नामपूरच्या अनेक मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी इतिहासकारांकडून ऐकायला मिळतात.