नाशिक : शासनाच्या ‘महाआॅनलाइन’च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील सेतू केंद्रे तसेच महा-ई-सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प झाले असून, हजारो दाखल्यांची कामे बंद पडली आहेत. या संदर्भात तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने केंद्रचालक हतबल झालेले असताना नागरिकांचा मात्र दाखल्यांसाठी तगादा सुरू झाला आहे. शासनाचे विविध दाखले देण्यासाठी आॅनलाइन पद्धतीचा वापर सेतू तसेच महा-ई-सेवा केंद्रचालक करीत असून, राज्य शासनाच्या महाआॅनलाइन या वेबसाइटच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज दाखल करण, दाखला तयार होणे व कागदपत्रांची तपासणी होऊन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दाखला वितरित करण्याचे काम आॅनलाइन पद्धतीनेच केले जात आहे. मध्यंतरी शासनाने अशा दाखल्यांसाठी आकारले जाणारे शुल्कदेखील आॅनलाइन पद्धतीने म्हणजेच पीओएस मशीनच्या साहाय्याने भरून घेण्याची सक्ती महा-ई-सेवा केंद्रचालकांना केली आहे. या साऱ्या नियम, निकषातून केंद्रचालक कामे करीत असताना गेल्या पाच दिवसांपासून महाआॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाले आहे. कोणत्याही दाखल्यासाठी आॅनलाइन काम करण्यास सुरुवात केल्यास ‘ट्राय अगेन’ इतकाच संदेश दिला जात असून, एकेक दाखल्यासाठी तासन् तास प्रयत्न करूनही हाती निराशा पडत आहे. महाआॅनलाइनचे कामकाज पाहणाऱ्या स्थानिक समन्वयकाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे केंद्रचालकांचे म्हणणे आहे. मात्र दाखल्यांसाठी नागरिकांचा होत असलेला तगादा पाहता त्यातून कसा मार्ग निघेल याविषयी काहीही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. (प्रतिनिधी)
पाच दिवसांपासून दाखले वितरण ठप्प
By admin | Updated: April 27, 2017 02:06 IST