लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराच्या प्रशासकीय यंत्रणेला सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पोलिस प्रशासनाकडूनही जिल्हाधिकाऱ्यांकडे 'झीरो कॅज्युल्टी, सेफ सिंहस्थ मेळा-२०२६-२७' आराखडा सादर करण्यात आला आहे.
यानुसार २०२७ साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात तीन पर्वणी मिळून तीन ते पाच कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दर बारा वर्षांनी गोदाकाठी हा मेळा भरतो. देशभरातून नव्हे, तर विदेशातूनसुद्धा भाविक याठिकाणी हजेरी लावतात.
साधू-संतांची यावेळी मांदियाळी असते. नाशिक शहरात २०१५ साली ८० लाख भाविकांनी हजेरी लावली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यावेळी उद्भवू नये, यासाठी आतापासून पोलिस प्रशासनाकडून नियोजन व तयारी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी पोलिसांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त कुमकसह २५ हजार पोलिसांचा फौजफाटा लागणार आहे. १,११२ कोटी निधीची गरज पोलिस प्रशासनाकडून १,११२ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वास्तविक आवश्यक खर्च म्हणून आराखड्यात दाखविला आहे.