मालेगाव : मालेगाव - नांदगाव रस्त्यावर जाटपाडे शिवारात ट्रकने ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत, तर पाच बैल जागीच ठार झाले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान किरकोळ दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालकावर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक राहुल अर्जुन महाले, रा.नांदगाव यांना अटक केली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल होत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी किरकोळ दगडफेक केली. या घटनेची माहिती अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक महाले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)
ट्रकच्या धडकेत पाच बैल ठार
By admin | Updated: January 13, 2017 00:38 IST