नाशिक : राज्य सरकारने १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात ‘हरित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दोन कोटी रोपांची लागवड करण्याचे जाहीर केले आहे. अभियानाच्या महिनाभर अगोदरच येत्या पाच तारखेला जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर नाशिककर पाच हजार रोपे लावून वनमहोत्सव साजरा करणार आहे. ‘हरित महाराष्ट्र’साठी नाशिककर आघाडीवर असून, यंदाही पहिले पाऊल नाशिककरच उचलणार आहेत.मागील वर्षी पर्यावरण दिनाच्या औचित्यावर नाशिककरांनी आपलं पर्यावरण संस्था व वनविभागाच्या सहकार्याने सातपूरला फाशीच्या डोंगरावर दहा तासांत ११ हजार रोपटे लावून विक्रमी वृक्षारोपण केले होते. याच धर्तीवर राज्य सरकारच्या वन खात्याने यावर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ व अन्य सरकारी विभागांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दोन कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूणच राज्यभर ‘नाशिक पॅटर्न’ राबविला जाणार आहे. यावर्षीदेखील नाशिककर पुन्हा आघाडी घेऊन सर्वप्रथम वृक्षारोपण करण्याची परंपरा पाळणार आहे. आपलं पर्यावरण संस्था, वनविभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून म्हसरूळच्या वनविभागाच्या जागेत पाच हजार भारतीय प्रजातीची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करणार आहे. ‘वनमहोत्सव’ संकल्पना मागील वर्षापासून लोकसहभागातून आपलं पर्यावरण संस्थेने शहरात राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत दरवर्षी शहराच्या बाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वृक्षलागवड करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
हरित महाराष्ट्रासाठी पहिले पाऊल नाशिकचे
By admin | Updated: May 30, 2016 00:19 IST