मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागात काल शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिलिंडर फुटल्याने आग लागून दहा घरे जळून खाक झाली. प्रारंभी एका घरास आग लागली. आगीने रुद्रावतार धारण केल्याने पाठोपाठ आठ ते दहा पत्र्यांच्या घरांना आगीने कवेत घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात संसारोपयोगी साहित्य जळाल्याने गरिबांचे संसार उघड्यावर पडले. जळालेली घरे पत्र्याची होती. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले नाही. रमजानपुºयात घरांना आग लागल्याचे अग्निशमन विभागास कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांना आठ खेपा कराव्या लागल्या. घटनास्थळी रमजानपुरा भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केले. यात सलीम शहा, करीम शहा, सलीम शेख, मुश्ताक अन्सारी यांची घरे आगीत जळून खाक झाली. यंत्रमाग मजूर व रोजंदारी कामगार यांची घरे जळाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
रमजानपुºयात आग; दहा घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST