नाशिक : मुंबई आग्रा महामार्गालगत घोटी शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत उसळलेला आगडोंब बुधवारी (दि. २२) दुपारनंतर अधिक वेगाने भडकला. तब्बल 24 तास पूर्ण होऊन देखील आग नियंत्रणात येते नसल्यामुळे आता औद्योगिक सुरक्षा विभाग व जिंदाल कंपनी व्यवस्थापनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडे ' एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडीला पाचरण करण्याची मागणी केली आहे. यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून पुणे येथील एनडीआरएफ बेस कॅम्पला संपर्क करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत एनडी आरएफची एक तुकडी जिंदाल कंपनीत दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली आहे.
जिंदाल कंपनीत असा आगडोंब उसळण्याची ही दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या कंपनीमध्ये आगीचा भडका उडाला.गुरुवारी (दि. २२) रात्री दोन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फोम, पाण्याचा मारा मागील २४ तासांपासून नाशिक अग्निशमन दलाचे सुमारे ३५जवान दहा बंबांच्या साह्याने युद्धापातळीवर परिश्रम घेत आहेत तरीदेखील कंपनीत उसळलेला आगडोंब नियंत्रणात आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.