नाशिक : अवैध गर्भलिंगतपासणी तसेच गर्भपातप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेले डॉ़ बळीराम शिंदे यांचे मुंबई - आग्रा महामार्गावरील कांदा-बटाटा भवनसमोरील डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी रविवारी (दि़२६) दुपारी सील केले़ विशेष म्हणजे डॉ़ शिंदे यांच्या ओझर येथील हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एम़ आऱ राठोड यांनी यापूर्वीच सिल केले आहे़ सातपूर परिसरातील अशोकनगरमधील एका गर्भवती महिलेची गर्भलिंग तपासणी केल्यानंतर स्त्रीचा गर्भ असल्याचे सांगून गर्भपात केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून चौकशी केली़ या छाप्यामध्ये डॉ़शिंदे हे गर्भलिंगतपासणी करून गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय सील करून डॉ़ शिंदे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़ या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ़ शिंदे यास न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी रविवारी (दि़२६) डॉ़ शिदे यांचे हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर सतेच निवासस्थानाची झडती घेतली़ दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेली झडती अडीच वाजता संपली़ मात्र यामध्ये काय आढळून आले याबाबत माहिती मिळू शकली नसली तरी गर्भलिंग तपासणी व गर्भपाताच्या गुन्ह्यांतील कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, डॉ़ शिंदेच्या ओझरमधील हॉस्पिटलमध्येही गर्भलिंग चाचणी व गर्भपात केल्याचेही समोर आले असून, निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. आर. राठोड यांनी या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सिल केले आहे. (प्रतिनिधी)
मुंबई नाक्यावरील शिंदे हॉस्पिटलला अखेर सील
By admin | Updated: February 27, 2017 00:50 IST