गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, वासाळी आदी ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर सदर बिबट्याला शनिवारी (दि. ४) मध्यरात्री वनविभागाकडून जेरबंद करण्यात यश आले आहे. बेलगाव कुऱ्हे येथील बिबट्याला जेरबंद केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा भरवीर खुर्द येथील १३ शेळ्या व एक बोकड फस्त करणारा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील टेंबुर्णी मळ्यात राहत असलेले शेतकरी किरण बाळू शिंदे या शेतकऱ्याच्या मागील महिन्यात १३ शेळ्यांसह एका बोकडावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केले होते. याआधीदेखील या बिबट्याने याच ठिकाणी एक बैल व दोन बोकड फस्त केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत वनविभागाच्या वतीने सदर घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला. यानंतर काही दिवसातच सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या ठिकाणी अजूनही एक बिबट्या असून पुन्हा हल्ला होऊ शकतो, या भीतीमुळे या परिसरात वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
कोट...
आतापर्यंत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळ्या, बैल, बोकड फस्त करीत नुकसान केले आहे. वनविभागाने अखेर बिबट्याला जेरबंद केल्यामुळे समाधान वाटत असले तरी परिसरात अजून एक बिबट्या असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे येथे बिबट्याची दहशत वाढली असून सदर बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्यात यावे.
- किरण शिंदे, शेतकरी, भरवीर खुर्द
फोटो - ०५ बिबट्या
भरवीर खुर्द येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या.
050921\05nsk_6_05092021_13.jpg
भरविर खुर्द येथे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात अडकलेला बिबट्या.