नाशिक : मायको सर्कल येथील वाळलेला धोकादायक वृक्ष वादळी वाऱ्यात उन्मळून पडण्याची शक्यता असल्यामुळे तातडीने येथील वृक्ष तोडण्याची मागणी केली जात होती. हा वृक्ष वर्दळीच्या चौकात असल्यामुळे वाहनांवरदेखील पडण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेने वाळलेला वृक्ष तोडला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मायको सर्कल येथून रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये-जा सुरू असते. पावसाळ्यालाही प्रारंभ झाल्याने हा वृक्ष कधीही उन्मळून पडण्याची भीती येथील व्यावसायिकांमध्ये व्यक्त केली जात होती, कारण रोहिणी नक्षत्राच्या पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपल्याने डौलदार वृक्ष उन्मळून पडले होते; मात्र सुदैवाने त्यादरम्यान हा वाळलेला वृक्ष तग धरून राहिल्याने अनुचित घटना घडली नाही. तरीदेखील संभाव्य काळात पावसाळ्यात हा वृक्ष कोसळण्याचा धोका कायम होता. यामुळे महापालिकेने तातडीने वाळलेला वृक्ष तोडावा याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. अखेर महापालिकेने येथील धोकादायक वृक्ष तोडल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
...अखेर वाळलेला धोकादायक वृक्ष तोडला
By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST