नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - अस्वली रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार हिरामण खोसकर, पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होते. आतापर्यंत लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याचे चार ते पाच वेळा भूमिपूजन करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे दर्जेदार काम झाले नसल्यामुळे लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकामाला जाग येत तातडीने दखल घेण्यात आली. भूमिपूजन करण्यात आले असले तरी याआधीदेखील लोकप्रतिनिधींकडून चार ते पाच वेळा भूमिपूजन करण्यात आले आहे. सदर रस्ता दर्जेदार कामापासून दूरच राहिला. यामुळे यावेळीदेखील रस्त्याचे तातडीने दर्जेदार काम होईल का, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे, सरपंच उषा रोकडे, बाळासाहेब कुकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे, तुकाराम सहाणे, सुदाम भोर, अरूण भोर, ॲड. चंद्रसेन रोकडे, गोंदे दुमालाचे माजी उपसरपंच कमलाकर नाठे, संपत मुसळे, ठेकेदार संजय आव्हाड, उपसरपंच नितीन काजळे, सुखदेव दिवटे, राजू रोकडे, मारूती डोळस, माधव कर्पे, रामकृष्ण दवते आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------
बांधकाम विभागाला निवेदन
नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची हाडे खिळखिळी होत असून, वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा केली असून, तसेच प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनदेखील संबंधित अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घोटीला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून, परिसरातील वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
---------------------
नांदूरवैद्य-अस्वली रस्त्याच्या भूमिपूजन करताना आमदार हिरामण खोसकरसमवेत सभापती सोमनाथ जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ. २) लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त. (२२ नांदूरवैद्य १/२)