इंदिरानगर : शिक्षण मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून विद्यार्थी व पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अडवणूक करून गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के फ ी वाढ करणारे चेतनानगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्राचार्य संजय पाटील व विश्वस्त आॅगस्टीन पिंटो यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात कॅपिटेशन अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात तुषार खंडू घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा विघ्नेश व सार्थक हे सेंट फ्र ान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत़ खासगी व विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याकडून टर्म फी, अॅडमिशन फी, ट्यूशन फी, अॅक्टिव्हिटी फी, कॉम्प्युटर फी, मंथली फी, मिसलीयन्स फी घेतली जाते़ त्यामधील ट्यूशन, अॅक्टिव्हिटी व लेट फ ी दर महिन्याला घेतली जाते़दरवर्षी शाळेकडून फीमध्ये वाढ केली जात असून, ती करताना विद्यार्थ्यांना अगर त्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारची तोंडी व लेखी पूर्वसूचना केली जात नाही़ २०१२ -२०१३ या शैक्षणिक वर्षात आकारलेल्या फीपेक्षा २०१३-२०१४ मध्ये अचानकपणे १८ टक्के, तर चालूवर्षी त्यामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे़ याविरोधात प्राचार्य संजय पाटील व विश्वस्त आॅगस्टीन पिंटो यांची विनायक सोनवणे, अरुण खांडबहाले, योगेश जाधव, अशोक चुंबळे, भाऊसाहेब बोराडे, कविता जगताप, इंदू विश्वकर्मा, ज्योत्स्ना संगम, प्रतिभा हांडे व पालकांनी विचारणा केली, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कैफियत मांडली़ शिक्षण मंडळाने शाळेला पत्र लिहून बेकायदेशीरपणे केलेली फ ी वाढ रद्द करण्याचे आदेश दिले; मात्र शाळेने या आदेशास केराची टोपली दाखविली़ विद्यार्थ्यांकडून वाढीव फी वसुली सुरूच असून, विद्यार्थ्यांच्या डायरीमध्ये सूचना लिहून देण्यात आल्या आहेत़ तसेच फी न भरल्यास परीक्षेला बसू न देणे, तसेच निकाल दाखविण्यात येणार नसल्याचेही नमूद करण्यात येत असून, लेट फी आकारली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे़शाळेचे प्राचार्य व विश्वस्तांच्या या मनमानी कारभाराविरोधात तुषार घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी कॅपिटेशन अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)