सोसायटी गटातील मतदारांची दिवाळी सुरू, उमेदवारांकडून सहलींचे आयोजन जिल्हा बॅँक निवडणूक : नाशिक : जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा कालावधी जसजसा कमी होत आहे, तसतसे इच्छुकांकडून अ गटातील सोसायटी मतदारांच्या गाठीभेटी व मतदारांना अज्ञात स्थळी रवाना करण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. एका तालुक्यातील माजी संचालक असलेल्या उमेदवाराने त्यांच्या अ गटातील सुमारे ४० हून अधिक सभासद मतदार उत्तर भारतात सहलीसाठी पाठविल्याचे समजते. काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या हक्काच्या मतदारांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असून, ढिकले-हिरे पॅनलच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू होताच दोेन्ही गटांमध्ये मान-सन्मान देण्या-घेण्यावरून आता चर्चा सुरू झाल्याचे समजते. ब गटासाठी असलेल्या सहा जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा दोन्ही गटांना मिळाल्या पाहिजे, अशा या माध्यमातून चर्चा सुरू झाल्याचे समजते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम प्रारूप मतदार यादी मागील आठवड्यात प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घेणे सहकार कायद्यातच तरतूद असल्याचे काही माजी संचालकांचे म्हणणे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी (दि.२२) घोषित होण्याची शक्यता आहे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर वाढू लागला
By admin | Updated: April 18, 2015 00:38 IST