नाशिक : येथील इंदिरानगर अंडरपासजवळून संशयास्पदरित्या जाणारी रुग्णवाहिका राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने रोखली. यावेळी अधिका-यांनी रुग्णावाहिकेची झडती घेतली असता, यामधून बनावट मद्याच्या बाटल्यांनी भरलेले २१ खोके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेसह मद्य जप्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी ते इंदिरानगर दरम्यान सापळा रचला. एका रुग्णवाहिकेतून मद्यसाठा शहरात आणला जाणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर अंडरपासजवळून जाणारी एक संशयास्पद रुग्णवाहिका रोखली. रुग्णवाहिकेची झडती घेतली असता त्यामधून बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या रुग्णवाहिकेवर नाशिकच्या आमदार, महापौरांपासून तर मंत्र्यांपर्यंत सर्वांचेच छायाचित्र झळकत आहेत. महापालिका निवडणूकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊ न ठेपले असताना शहरात अवैधरित्या मद्याचा पुरवठा आणि वाटपाचे बेत आखले जात असल्याचे यावरुन स्पष्ट होते. मद्य नेमके कोणासाठी प्रचार करुन थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी की मतदारांना ह्यआमिषह्ण म्हणून वाटण्यासाठी याविषयच्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. गुरूवारी (दि.१७) एका राजकिय उमेदवाराने मद्याचा साठा अशोक स्तंभ भागातील एका घराच्या छतावर दडविल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले होते. ज्या घरावर हा साठा दडविण्यात आला होता त्याच घरातील एका भावी नागरिकाने जागृक नागरिकाचे कर्तव्य म्हणून थेट पोलिसांना याची माहिती दिली. यामुळे सदर प्रकार प्रकाशझोतात आला होता. एकूणच निवडणूक काळात पोलीस, महापालिका, निवडणूक यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क असे सर्वच शासकिय यंत्रणा डोळ्यांत तेल घालून असली तरीदेखील अवैधरित्या होणारे ह्यउद्योगह्ण सुरूच असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.