नाशिक : महापालिकेत घरपट्टी-पाणीपट्टीसह विविध करभरणासाठी पाचशे-हजारच्या नोटा येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जाणार असून, तसे निर्देश राज्य शासनाकडून प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत महापालिकेच्या खजिन्यात सर्व एकत्रित कराची रक्कम १६ कोटी ६६ लाख रुपये जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाने महापालिकेलाही करभरणासाठी ग्राहकांकडून पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, दि. १० नोव्हेंबरपासून महापालिकेने सुरुवातीचे दोन दिवस सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आणि नंतर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील सर्वच्या सर्व १८ बिलिंग काउंटर खुले ठेवले होते. दि. १४ नोव्हेंबरअखेर महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टी ९ कोटी १४ लाख रुपये तर पाणीपट्टी १ कोटी ९६ लाख रुपये जमा झाले आहे. याशिवाय, नगररचना आणि विविध करांचीही वसुली झाली. दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी (दि.१४) नव्याने निर्देश देत रुग्णालये, पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन आदि ठिकाणी दि. २४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याबाबत कसलेही निर्देश नव्हते. मंगळवारी राज्य शासनाने याबाबतचे परिपत्रक सर्व महापालिका आयुक्तांना पाठवत करभरणासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविली. निर्णयाबाबत संभ्रमावस्था असल्याने मंगळवारी घरपट्टी ५५ लाख रुपये, तर पाणीपट्टी १५ लाख ६९ हजार रुपये जमा होऊ शकली. मात्र, दि. २४ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेची सर्व बिलिंग सेंटर्स सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असून, नागरिकांकडून पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टी, पाणीपट्टी तसेच नगररचना आणि विविध करांच्या माध्यमातून १६ कोटी ६६ लाख रुपये वसूल झाले आहेत.
महापालिकेत करभरणासाठी शासनाकडून मुदतवाढ
By admin | Updated: November 16, 2016 00:59 IST