ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विवेक जुन्नरे, बी. एच. मरसाळे, सरपंच विमल बिन्नर, निवृत्ती बिन्नर, वसंत सहाणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. बी. निकम, आर. यू. अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. हिवरेसारख्या ग्रामीण भागात असलेल्या या माध्यमिक विद्यालयाचा निकाल गत तीन वर्षांपासून शंभर टक्के लागतो, ही कौतुकाची बाब असल्याचेही पाटील यांनी सांगितले. विद्यालयाच्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी अशोक बिन्नर, निवृत्ती गुरकुले, डी. डी. बिन्नर, डी. व्ही. परदेशी, एच. पी. जाखडी, भारत सहाणे, ऊर्मिला बिन्नर, संतोष चव्हाण आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर. यू. अहिरे यांनी प्रास्ताविक केले. बी. एच. वाघ यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
हिवरे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 22:23 IST