आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:55 AM2020-11-14T00:55:23+5:302020-11-14T00:56:56+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे पूर्ण ठप्प होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ऐन दिवाळीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे बाजारात पुन्हा उलाढालीने वेग पकडला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या मनातील धास्ती बरीचशी कमी झालेली असल्याने यंदा लक्ष्मीपूजन पारंपरिक उत्साहातच पार पडणार आहे.

Excitement of Lakshmi Puja today | आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह

आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह

googlenewsNext

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे पूर्ण ठप्प होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ऐन दिवाळीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे बाजारात पुन्हा उलाढालीने वेग पकडला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या मनातील धास्ती बरीचशी कमी झालेली असल्याने यंदा लक्ष्मीपूजन पारंपरिक उत्साहातच पार पडणार आहे.

आपापल्या घरी, दुकानात, व्यवसायाच्या स्थानी सदैव लक्ष्मीदेवतेचा वास असू दे, अशी मनोभावे प्रार्थना करीत लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वांसाठी पर्वणीचा दिवस असतो. प्रातःकाळी मंगलस्नान करून लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हन ठेवून त्यावर लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवितात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ नागरिकांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, असे मानले जाते. लक्ष्मीपूजन करताना चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला चढविली जाते. लक्ष्मीची पूजा करताना, आवाहन व प्रतिष्ठापना विधीच्या पार्श्वभूमीवर हातात अक्षता घेऊन ॐ महालक्ष्‍मी देवी! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठित हो. या मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे.

इन्फो

लक्ष्मीपूजन मुहूर्त

दीपोत्सव पर्वातील अमावस्येचा आहे. हा दिवस शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खतावणीचे पूजनदेखील करण्याची परंपरा आहे. सकाळी ८.०८ ते ९.३२ (शुभ) दुपारी १.४३ ते ३.०७ (लाभ), दुपारी ३.०७ ते ४.३१ (अमृत) सायंकाळी ६.५४ ते ७.३० (लाभ) रात्री ९.०६ ते रात्री १०.४२ (शुभ) असे लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत.

नरकचतुर्दशीनिमित्त अभ्यंगस्नान

शनिवारी नरक चतुर्दशीदेखील असल्याने या दिवसाचे अधिकच महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि देवीने नरकासुराचा वध केल्याचे मानले जाते. त्यामुळे दीपोत्सव पर्वात नरकचतुर्दशीला सकाळी अभ्यंग स्नानाचे मोठे महत्त्व आहे. यंदा अभ्यंग स्नानासाठी सकाळी ५.३१ पासून मुहूर्त आहे.

Web Title: Excitement of Lakshmi Puja today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.