साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गुरुवारी सायंकाळी वीजवाहिन्यांमध्ये घर्षण झाल्याने अनेक घरातील वीज उपकरणे जळाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाईची मागणी वितरण कंपनीकडे केली जाणार आहे. साकोरा नवेगाव शिवारातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आवारात असलेल्या रोहित्रजवळील मेनलाइनवर काही कावळे बसलेले असताना चांदोरा रस्त्यावर अचानक आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने या तारांचा संपर्क झाल्याने जोरात आवाज झाला. त्यामुळे अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर अनेकांच्या घरातील वीज उपकरणे जळून खाक झाली. त्यात राममंदीर चौक, चांदोरा रोड, रामलीला चौक, डॉ. आंबेडकर चौक, माणिक चौक आदी ठिकाणचे भावराव बोरसे, बाळू बोरसे, सीमा बोरसे, माळीसर, वसंत बोरसे, शांताराम बोरसे, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुलाल ठाकरे, बाबा फुला बोरसे, रमेश हिरे, बापू बोरसे, काशीनाथ बोरसे, राजेंद्र बोरसे, धोंडीराम बोरसे, प्रकाश निकम अशा अनेकांच्या घरातील टीव्ही, घरगुती वीजपंप, दिवे, इन्व्हर्टर, फ्रीज जळाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून तेच जीर्ण खांब व तारा यामुळे गावात तसेच शिवारात बºयाच ठिकाणी तारांच्या झोळ्या झाल्या आहेत. तसेच रोहित्रावर कोणतेही फ्युज नसल्याने धोक्याची परिस्थिती दिसून येत आहे. रात्री अपरात्री डीओ किंवा फ्युज गेल्यावर गावात स्थानिक वायरमन नसल्याने बरीच कामे गिरणीचालकांना करून घ्यावी लागतात. आज बारा हजार लोकवस्तीच्या गावात एक आणि शेतशिवारात अवघे दोन असे तीनच वायरमन येतात. तेसुद्धा अपडाऊन करत असल्याने गावात अशा कामांची हाप डाउन परिस्थिती निर्माण झाली आहे.
नांदगावी शॉर्टसर्किटमुळे उपकरणांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:22 IST