नाशिक : महापालिका तसेच विविध विभागीय कार्यालये आणि महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’वर मोठ्या उत्साहात ‘श्रीं’ची स्थापना झाली. महापौर अशोक मुर्तडक यांचे नृत्य हे लक्षवेधी ठरले, शिवाय सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरले आहे. शहरातील मानाच्या गणपतींमध्ये महापालिकेचा गणपती अग्रस्थानी असतो. महापालिकेच्या वतीने पूर्व विभाग आणि राजीव गांधी भवन येथे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि सौम्या कृष्ण यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी आणि सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी साकडे घातले. महापौरांचे पालिका निवासस्थान असलेल्या रामायण येथेही गणरायाची महापौरांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालिकेत झालेल्या गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शिक्षण सभापती संजय चव्हाण, पूर्व प्रभागाच्या विभागीय अधिकारी नीलिमा आमले, नगरसेवक सचिन महाजन तसेच अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, सहायक आयुक्त जयश्री सोनवणे यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.दरम्यान, महापालिकेच्या सहा विभागात सहा ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना होते. शिवाय विविध विभागातदेखील खातेनिहाय गणपतीची स्थापना करण्यात आली. यापूर्वी महापालिकेचा ‘एक खाते एक गणपती’ पद्धत बंद करण्याची सूचना आली असतानादेखील विविध विभाग आणि खात्यांमध्ये वेगवेगळे गणपती प्रतिष्ठापीत करण्यात आले आहेत. या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अनेकांनी कुटुंबासह प्रतिष्ठापना उत्साहाला हजेरी लावली. (प्रतिनिधी)
महापालिका, ‘रामायण’वर ‘श्रीं’च्या स्थापनेचा उत्साह
By admin | Updated: September 6, 2016 01:03 IST