नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून शहरात जागा उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला अखेर आज मुहूर्त लागला. महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटन अभिनेत्री तथा महामंडळाच्या संचालक अलका कुबल-आठल्ये यांच्या हस्ते झाले; मात्र उद्घाटन कार्यक्रमातच विस्कळीत कारभाराचे दर्शन घडल्याने उपस्थितांना जणू ‘प्रथमग्रासे मक्षिकापाता’चाच अनुभव आला. शालिमार येथील शालिमार प्लाझा इमारतीत ‘चित्रतीर्थ’ या नावाने सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी गाळा उपलब्ध करून दिला. अलका कुबल-आठल्ये, खासदार गोडसे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुंडेगाव येथे चित्रनगरीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे गोडसे यांनी यावेळी सांगितले. महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, प्रमुख कार्यवाह सुभाष भुरके, खजिनदार सतीश बिडकर, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, सदानंद सूर्यवंशी, बाळासाहेब बारामती, व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा श्याम लोंढे, अरुण रहाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रवि बारटक्के, मुकेश कणेरी, प्रशांत जुन्नरे, राजेश जाधव, आनंद बच्छाव, ईश्वर जगताप उपस्थित होते. दरम्यान, महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असूनही तो अत्यंत सुमार दर्जाचा व विस्कळीत झाला. लहान जागेत बरीच गर्दी झाल्याने नेमके काय सुरू आहे, हे कोणालाच उमगत नव्हते. नाशिकमध्ये तयार झालेल्या चित्रपटांविषयीची अर्ध्या तासाची ध्वनिफीत यावेळी दाखवण्यात आली; मात्र गोंधळात ती कोणालाच पाहता आली नाही. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर हे अन्य एका कार्यक्रमाला गेल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. महामंडळाच्या वतीने सायंंकाळी पलुस्कर सभागृहात निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते; मात्र कुबल यांच्या व्यग्रतेमुळे तेसुद्धा रद्द करण्यात आले.
चित्रपट महामंडळाला अखेर मुहूर्त
By admin | Updated: November 7, 2015 23:44 IST