नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शिंदे गावठाण भागातील दोन-तीन मजली इमारतीसह कच्च्या-पक्क्या घरांचे, पत्र्यांच्या दुकानाचे असे २३ अतिक्रमणे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी किरकोळ विरोध केल्याने वाद-विवाद निर्माण झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी नाशिकरोड व सिन्नर येथुन महामार्गावरील वाहतुक वळविण्यात आल्याने सर्वांचे चांगलेच हाल झाले.नाशिकरोड-पुणे महामार्ग (नॅशनल हायवे क्र. ५०) चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ २०१४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर काही भागातील काम अत्यंत प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र नाशिकरोडच्या सिन्नरफाटा, चेहेडी, शिंदे गावठाण भागात भुसंपादन करतांना अनेक घरे, दुकाने जमीनदोस्त करावी लागणार होती. त्यातच काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रश्न भिजत पडला होता. शिंदे गावठाण भागातील २३ जणांना आपली कच्ची-पक्की घरे, दुकाने, पत्र्याचे शेड काढुन घेण्याबाबत अंतिम नोटीस या महिन्यात बजविण्यात आली होती. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी, भुसंपादन अधिकारी दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल विभाग, भूअभिलेख, महावितरण, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी-कर्मचारी व महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या केतक एंटरप्राईजेसचे १५० कामगार यांनी दोन पोकलॅँड मशीन, चार जेसीबी, ट्रक आदिंच्या साह्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, अतुल झेंडे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिक्रमण काढतांना कुठली दुर्दैवी घटना घडू नये म्हणून त्या भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रारंभी घरमालक, दुकानदार आदिंनी विरोध करून अद्याप आम्हाला शासनाकडून सर्व पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र रहिवासी, ग्रामस्थ, दुकानदार यांची समजुत काढुन आॅर्डर प्रमाणे काम करावेच लागणार आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी तुम्हीच तुमचे सामान काढुन घ्या असे स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे काही जणांनी आपले कच्चे-पक्के घर, दुकाने, पत्रे, अॅँगल आदि साहित्य स्वत:हुन काढण्यास सुरूवात केली. (प्रतिनिधी)
शिंदेगावातील अतिक्रमण हटविले
By admin | Updated: February 28, 2017 02:03 IST