बचत गटांमुळे महिलांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:54 AM2019-02-28T00:54:31+5:302019-02-28T00:54:52+5:30

पारंपरिक बचत गटांचे स्वरूप आता बदलत असून, नवे तंत्रज्ञान बचतगटांनी स्वीकारले आहे. यामुळेच लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत पोहचविले आहे.

Empowerment of women by saving groups | बचत गटांमुळे महिलांचे सक्षमीकरण

बचत गटांमुळे महिलांचे सक्षमीकरण

Next

नाशिक : पारंपरिक बचत गटांचे स्वरूप आता बदलत असून, नवे तंत्रज्ञान बचतगटांनी स्वीकारले आहे. यामुळेच लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत पोहचविले आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, शिक्षण सभापती यतिन पगार, जि.प.सदस्य भारती पवार, नितीन पवार, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त सुखदेव बनकर, प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे आदी उपस्थित होते.  यावेळी सांगळे यांनी बचत गटांमार्फत महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत असल्याने महिला स्वयंसहायता समूहांनी जुनी खाद्यसंस्कृती टिकवली आहे. महिलांनी एकत्रित प्रयत्न करून या चळवळीला अधिक गती द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी मेळाव्याच्या उद्देशाची माहिती दिली. मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण वस्तुंची वाजवी दरात विक्री होऊन ग्राहकांचा व बचतगटांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. महिला बचत गटांनी कुपोषण निर्मूलन, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठीही काम करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांनीदेखील मार्गदर्शन केले. देशातील २८ टक्के महिला उत्पादन क्षेत्राशी संबंधित असून हे प्रमाण ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास उत्पादनात७०० अब्ज डॉलर्सची वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. पोलीस कुटुंबातील महिलांना संधी मिळवून देण्यासाठी त्यांच्या गटाने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विभागीय कार्यालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांनी महिला बचत गटांच्या कामांबाबत मार्गदर्शन करताना बचतगट हे संस्कारपीठ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. शासानाने बचत गटाच्या उत्पादनाला बाजार मिळवून देण्यासाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बचत गटांनी उत्पादनात नावीन्य आणून स्पर्धेसाठी सक्षम बनावे,असे आवाहन त्यांनी केले.  जिल्हा परिषद सदस्य भारती पवार यांनीदेखील गटातील महिलांशी संवाद साधला. सूत्रसंचालन अनुराधा मठकरी यांनी केले.
दोनशे स्टॉल्सद्वारे प्रदर्शन
प्रदर्शनात सुमारे दोनशे स्टॉल्स असून स्टॉल्समध्ये वस्तू विक्र ीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. धुळे २२, नंदुरबार १६, जिल्ह्यांच्या जळगाव १८, अहमदनगर २० आणि नाशिक जिल्ह्याचे ११० स्टॉल्स आहेत. यात१३३ स्टॉल्स विविध उत्पादनांचे तर ४७ स्टॉल्स खाद्यपदार्थांचे आहेत. इतर शासकीय विभागांनीदेखील प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. बचत गटांनी तयार केलेल्या सुंदर गोधड्या, कांबळ, पर्स, शोभेच्या वस्तू, गृहपयोगी वस्तू, पापड-कुरडया, मसाल्याचे पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, द्राक्षे, तांदूळ, डाळ, तयार कपडे, पैठणी, लाकडी वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, आयुर्वेदिक उत्पादने, सजावटीच्या वस्तू आदी विविध उत्पादनांना विक्र ीसाठी ठेवण्यात आले आहे. महिला बचत गटाच्या या विक्रीतून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे़ जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यभर जिल्ह्या-जिल्ह्यात राबविला जावा अशा भावना महिला बचत गटाच्या स्टॉलधारकांनी व्यक्त केला आहे़ महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांचे मेळाव्यांचे आयोजन हे उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Empowerment of women by saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.