सातपूर : कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागातील आयटीआयसाठी दोनदिवसीय रोजगार क्षमता अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.एमराल्ड पार्क येथे आयोजित अभ्यासक्रमात नाशिक विभागातील आदिवासी पट्ट्यामध्ये काम करणाऱ्या आयटीआयमधील प्रशिक्षकांच्या सरावाची जबाबदारी घेतली आहे. संभाषण कौशल्य विकासासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, माहिती तंत्रज्ञान साक्षरता, उद्योजकता आणि दर्जा साधने आणि व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य, तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी सीआयआयचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी सांगितले की, नाशिक विभागातील आदिवासी भागातील आयटीआयचे प्रशिक्षक सहभागी होत आहेत. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगार क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षकांना मदत होणार आहे.पुणे येथील टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख शिवराम कृष्णन यांनी विविध उपक्रमांचा उल्लेख करताना या विद्याशाखा विकास कार्यक्रमांतर्गत इंग्रजी संभाषण कौशल्य, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य, पर्यावरण, कामगार कल्याण कायदा, गुणवत्ता साधने आणि त्यांच्या मूलभूत गरजा यांची प्रशिक्षणाद्वारे ओळख होईल. प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याचे सांगितले. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सतीश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून आयटीआयमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे. शिवाय आयटीआय प्रशिक्षकांच्या कौशल्यात वाढ होईल, असे सांगत कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री आणि टाटा मोटर्सच्या उपक्रमाचे कौतुक केले. या दोनदिवसीय कार्यक्रमात विविध विषयांतील तज्ज्ञ प्रशिक्षक सुनील पाटील, पी. के. जोशी, हर्षद कडुस्कर आदिंनी विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. (वार्ताहर)
आयटीआयमध्ये रोजगार क्षमता कार्यशाळा
By admin | Updated: March 15, 2017 23:00 IST