नाशिक : ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले आहे. जिल्हा परिषदेने आता ग्रामसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे सदर ग्रामसेवकाने स्वत: पैसे ताब्यात न घेता ते मित्रांच्या बँक खात्यात जमा करून नंतर काढून घेतल्याची नवीन शक्कल लढविली आहे. दिलीप मोहिते असे या ग्रामसेवकाचे नाव असून, तो नाशिक शहरातील पंचवटीत राहतो. आशेवाडी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना मोहिते याने हा अपहार केला.ग्रामपंचायतीबरोबर मित्रांचीही फसवणूकnदिलीप मोहिते याने फसवणूक करताना त्याच्या मित्रांचीही फसवणूक केली आहे. खात्यावर पैसे येणार आहेत, परंतु इन्कम टॅक्समुळे मला ते खात्यावर नको असल्याने तुमच्या खात्यावर पैसे टाकतो, नंतर मला काढून द्या, असे म्हणत मोहिते याने मित्रांच्या बँक खात्यांची माहिती घेतली व परस्पर खात्यावर अपहाराची रक्कम वर्ग करून घेतली. पैसे आल्याचे पाहून मित्रांकडून ते परत घेतले. आता मात्र ही रक्कम ग्रामपंचायतीची असल्याचे समजल्यावर मोहिते यांचे मित्र अडचणीत आले आहेत. nग्रामपंचायतीच्या बँक खात्यातील पैसे त्याने मित्रांच्या खात्यात धनादेशाद्वारे टाकले. नंतर त्यांच्याकडून रोख स्वरूपात काढून घेतले आहेत. या अपहारात सरपंचदेखील सहभागी असून, प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत ३५ लाख रुपये अशा प्रकारे हडपण्यात आले आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले असून, ग्रामपंचायतीच्या रकमेच्या अपहार प्रकरणी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली जात आहे.
मित्राच्या खात्यावर पैसे टाकून आशेवाडी ग्रामसेवकाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:53 IST
ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले आहे.
मित्राच्या खात्यावर पैसे टाकून आशेवाडी ग्रामसेवकाचा अपहार
ठळक मुद्देशक्कल : जिल्हा परिषदेकडून गुन्हा दाखल करण्याची तयारी