नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले असून, ठिकठिकाणी वीज पडून जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. नाशिक शहरातही दुपारी अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली, त्यानंतर मात्र हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने नंतरच्या कालावधीत दडी मारली, त्यामुळे परतीचा पाऊस निघूनही गेल्याची भावना व्यक्त केली जात असताना गेल्या काही दिवसांपासून भाद्रपदाचे कडाक्याचे ऊन तापण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा व रात्री गारवा अशा दुहेरी हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी दुपारपर्यंत कोपलेल्या सूर्यदेवाला अचानक दोन वाजता ढगांनी वेढले व काही वेळातच विजेचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहराप्रमाणेच ग्रामीण भागात म्हणजेच पेठ, सुरगाणा, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपले. त्यात सुरगाणा तालुक्यातील चिखली येथे वीज पडून यशवंत लक्ष्मण चौधरी हे जागीच ठार झाले तर युवराज चंदर भोये हे जखमी झाले. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी येथेही जगन बहिरम व हिरामण बहिरम हे दोघेही वीज पडून जखमी झाले. चांदवड तालुक्यातील साळसाणे येथेही विजेच्या कडकडाटाने कोसळलेल्या पावसामुळे सुदाम सूर्यभान जाधव यांची गाय वीज पडून मृत झाली, असाच प्रकार पेठ तालुक्यातील भाटविहरा येथील नारायण सोमा तुंगार यांचा बैल मृत्युमुखी पडला. दिंडोरी तालुक्यातीलच मौजे प्रिंप्रीअंचला येथील पंडित लक्ष्मण गावित यांच्या मालकीची गायदेखील विजेच्या धक्क्याने मरण पावली. निफाड तालुक्यातील विंचूर टाकळी येथे वादळी पावसाने सुरेश कारभारी मोरे यांच्या घराचे पत्रे उडून जवळच असलेल्या निंबाच्या झाडावर आदळले.
जिल्ह्यात वीज, पावसाचा धुमाकूळ
By admin | Updated: October 3, 2015 00:06 IST