मनोज मालपाणी, नाशिक : नाशिकरोडपासून जवळच असलेल्या जेलरोड भागात एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या ७६वर्षांच्या पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लता मुरलीधर जोशी (७६), मुरलीधर रामचंद्र जोशी (८०) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत.
जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात आहेत. त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह अन्य शहरात राहतात. लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. दुपारी मोलकरीण घरातून काम आटोपून निघून गेल्यानंतर संशयित मुरलीधर जोशी यांनी ‘मी माझ्या पत्नीवर खुप प्रेम करतो, तिची आजारपणातून सुटका करत आहेत...’ अशी चिठ्ठी लिहून गळा आवळला व त्यानंतर स्वत:ही गळफास घेतल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले.
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाकासाठी जेव्हा मोलकरीण आली व तिने दरवाजा उघडला तेव्हा, मुरलीधर जोशी हे लटकलेल्या अवस्थेत व लता जोशी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलिस ठाण्यात सुरू हाेते.