सुयोग जोशी
नाशिक - जिल्हा परिषद, तसेच इतर आस्थापनांमधील ५८ प्राथमिक शिक्षकांना नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन केल्याप्रकरणी महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांचा पदभार अखेर आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि.१७) काढून घेतला असून गोदा संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे.
नवीन शिक्षणाधिकारी लवकरच नेमण्यात यावा अशी मागणीही मनपाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन केल्या प्रकरणात अनियमितता झाल्याचे मान्य करत या प्रकरणाची सध्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या समितीला १५ दिवसात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात बी. टी. पाटील यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळात नगरविकास मंत्र्यांच्या वतीने दि. ११ मार्च रोजी दिले होते. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सादर केली होती.