नाशिक : समाजातील वाढत्या गैरप्रकारांना शिक्षणामुळेच आळा बसू शकतो. समाजात वावरताना वारंवार विविध घटनांमधून राक्षसीवृत्ती प्रकाशझोतात येते. अशा राक्षसीवृत्तीवर शिक्षणानेच मात करता येऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या पेशाचा अभिमान बाळगत समाजात माणूस घडविण्याचे अलौकिक कार्य करावे, असे प्रतिपादन पुणे येथील टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी केले. सार्वजनिक वाचनालय नाशिक व नागरिक शिक्षक गौरव समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षक गौरव सोहळ्याप्रसंगी टिळक प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रख्यात शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ कै. ब. चिं. उर्फ बाळासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या ४६व्या शिक्षक गौरव सोहळ्याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, सेवानिवृत्त, क्रीडा, संगीत, कला आदि गटांमधील एकूण २३ गुरुजनांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, समितीचे अध्यक्ष रा. शां. गोऱ्हे, मिलिंद जहागिरदार आदि उपस्थित होते. दरम्यान, टिळक यांनी पुढे बोलताना सांगितले, शिक्षकांनी नेहमीच आपल्या पेशाविषयी अभिमान बाळगावा. कारण जीवनात विविध टप्प्यांवर त्यांना त्यांचा विद्यार्थी वेगवेगळ्या रूपाने भेटत असतो, अशावेळी शिक्षकांना होणारा आनंद आणि त्यामधून मिळणारे समाधान अनमोल असते. त्यामुळे हा एकमेव असा पेशा आहे, जो जीवनभर आनंद व समाधान मिळवून देतो. दरम्यान, टिळक यांच्या हस्ते शिक्षकांना स्मृतिचिन्ह-सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक गोऱ्हे यांनी केले व सूत्रसंचालन विनया केळकर यांनी केले. (प्रतिनिधी)
शिक्षणानेच राक्षसीवृत्तीवर मात शक्य
By admin | Updated: September 23, 2015 23:36 IST