नाशिक : सातपूर ते पाथर्डी फाटा दरम्यान पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने सिडको आणि सातपूरच्या बहुतांशी भागात दुपारनंतर पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सायंकाळनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी अनेकांना पाण्यासाठी भ्रमंती करावी लागली.सिडको विभागात शिवाजीनगर ते पाथर्डी फाटा दरम्यान असलेल्या १२०० मि.मी. व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे हा प्रकार घडला. सदरचा प्रकार घडल्यानंतर महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले; परंतु तरीही अनेक भागांत पाणीपुरवठा झाला नाही. पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील प्रभाग क्रमांक ४१ ते ४९ आणि ५१ ते ५३ या प्रभागांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही. तसेच सातपूर विभागातील चुंचाळे गाव, रामकृष्णनगर, केवल पार्क, आझादनगर, पाटील पार्क, सातपूर गाव याठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र महात्मा नगर, पारिजातनगर, वनविहार कॉलनी या भागातही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या भागात आता मंगळवारी (दि. ३०) सकाळी या भागात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने कळविले आहे.
जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प
By admin | Updated: December 30, 2014 01:40 IST