नाशिक : मागील आठवड्यात आलेल्या महापुराचा फटका नवीन शाहीमार्गालाही बसला आहे. गौरी पटांगणापासून अमरधामपर्यंत शाहीमार्गाची दैना उडाली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाण्यात वाहून आलेला कचरा येथील दुभाजकांवरील झाडीमध्ये अडकला आहे. पथदीप कोसळले असून, दुभाजकांची पडझड झाली आहे.नवीन शाहीमार्ग रामकुंड आणि तपोवनाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर आणि फायदा पर्यटकांना सर्वाधिक होतो. पर्यटकांची लहान-मोठी वाहने या मार्गावरून नाशिकदर्शन करताना सुरक्षित आणि सोयिस्करपणे मार्गस्थ होतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी महापालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करत सुशोभिकरण केले होते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या सुमारे चार फूट रुंदीच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. झाडांची वाढ बऱ्यापैकी झाल्याने रस्त्याचे सौंदर्य खुलले होते; मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या गोदावरीच्या महापुराने सर्वच रस्ते धुऊन नेले. नव्या शाही मार्गाची दुरवस्था पुरामुळे झाली आहे. दोन्ही बाजूंना चिखलाचे साम्राज्य पसरले असून, पुरात वाहून आलेला कचरा दुभाजकांमधील बोगनवेलीच्या झुडपांमध्ये अडकला आहे. दुभाजकांतील पथदीपही कोसळले असून, दुभाजकांची पडझड झाली आहे. (प्रतिनिधी)
महापुराने शाहीमार्गाची दैना
By admin | Updated: August 8, 2016 23:21 IST