सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील उघडे पावसाळी नाले व गटारी या गेल्या अनेक महिन्यांपासून साफ केल्या जात नाहीत. सदरचे नाले व गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत त्वरित साफसफाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिडको ही कामगार वस्ती आहे. तसेच दाट लोकसंख्या असल्याने आधीच मोकळा श्वास घेणे कठीण झालेले असतानाच नागरी वस्तीतून जाणारे उघडे पावसाळी नाले व गटारींमधील घाण व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने सिडकोतील दत्त चौक, मोरवाडी, तोरणानगर, पंडितनगर, साईबाबानगर, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणचे उघडे नाले व गटारी या नियमित साफ करणे गरजेचे आहे. या नाल्यांत व गटारींत परिसरातील नागरिक घरातील शिळे अन्न, घाण, केरकचरा आदि साहित्य टाकतात. सदरचे नाले हे साफ केले जात नसल्याने घाणीमुळे दुर्गंधी पसरते, रोगराईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, तसेच डासांचेही प्रमाण वाढत असल्याने याबाबत मनपाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने उघडे नाले व गटारी या नियमित साफ केल्या जात नसल्या तरी, निदान पावसाळ्यापूर्वी तरी त्या साफ करण्याची गरज असल्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: May 21, 2014 01:07 IST