नाशिक : जिल्ह्यातील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच असल्याने शहरांच्या आरोग्यासह स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे पालिकेतील संपूर्ण यंत्रणा कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह आरोग्य, स्वच्छता व जलनिस्सारण या मूलभूत समस्यांनी डोके वर काढले असून, ऐन पावसाळ्यात समस्या व साथींच्या आजारांमुळे जनतेत क्षोभ निर्माण झाला आहे.सुमारे ४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सटाणा शहरात सात प्रभाग आहेत. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीन ते चार दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना पालिका कर्मचारी संपात सहभागी झाले त्या दिवसापासून शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. सद्यस्थिती उद्भव विहिरींना पाणी असताना तांत्रिक अडचणींमुळे शहरात पाण्याची समस्या उग्र रूप धारण करून लागली आहे.शहरातील नाले व गटारी साफसफ ाई होणे बंद झाले आहे. शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. रस्तोरस्ती व नववसाहत परिसरात रस्त्यावर कचरा दिसू लागला आहे. मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढलेला असताना रस्त्या-वरील कचरा व सांडपाणी एकत्र येऊन डास व मच्छरांचे प्रमाण वाढू लागले आहे. सायंकाळी घराबाहेर व दुकानाबाहेर पडणे मुस्कील झाले आहे. इगतपुरी : नगरपरिषदेतील कायम कामगार ठेकेदारी सफाई कामगारांचा आज तिसऱ्या दिवशीही बेमुदत संप सुरू असल्याने शहरात सर्वच ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ऐन पावसाळ्यातील या संपामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेमुदत संपाला म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने पाठिंबा दिला असून, आज नगरपालिकेतील कामगारांनीही कामबंद आंदोलन दिले. नगरपालिकेतील सर्व कामे ठप्प झाली, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनातील कामगारांनीही संपात सहभाग घेतल्याने रोजच्या दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. शहरात संततधार पाऊस सुरू असून, शहरातील प्रत्येक चौकाचौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वजण हा संप मिटेल याची वाट पाहत आहे. (लोकमत चमू)
पालिका कर्मचारी संपामुळे घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: July 19, 2014 21:13 IST